Great Indian Stories


भारत हा जगाच्या नकाशावरील एक प्रमुख देश आहे. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या काही मोजक्या देशांपैकी हा एक देश आहे. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे. अनेक वर्षांची प्राचीन संस्कृती आहे. अनेक मोठी मोठी साम्राज्ये ह्या देशात उदयाला आली आणि कालपरत्वे लयास गेली. ह्या साम्राज्याच्या उभारीच्या काळात अनेक कला, वास्तू, भाषा, ज्ञान, धर्म, अध्यात्म अशा अनेक अंगाचा विस्तार ह्या देशामध्ये झाला. अनेक भाषा आणि प्रांतावर रचना असलेले आणि एकोपा असलेले भारत हे जगाच्या पाठीवर एकमेव राष्ट्र असेल. ह्या देशाचे स्थान जगाच्या पाठीवर अशा जागेवर आहे जेथे उन्हाळा,पावसाळा,हिवाळा असे सर्व ऋतू ठराविक कालावधीने येतात. जगातील असा दुसरा कुठलाच देश नसेल. 

300px-India_(orthographic_projection)
image source-wikipedia
अशा ह्या देशाला अनेक प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपुर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली त्यानंतर सिधू संस्कृतीचा विकास झाला आणि भारताच्या खऱ्या इतिहासाला सुरुवात झाली. त्यानंतर ह्या देशाच्या संपत्तीवर अनेक परकीय आक्रमण होऊ लागली. ह्या देशाच्या काही साम्राज्यांनी ती आक्रमणे परतवून लावली तर काही आक्रमणे साम्राज्याचा अस्त करून गेली. 
ह्या सर्व धामधुमीत ह्या देशाचा सांस्कृतिक विकास कधीच थांबला नाही. अतिशय सुंदर असे साहित्य, पुराने, वेद ह्या देशात लिहिली गेली. महाभारत, रामायण सारखे जगातील पहिले महान आणि मोठे ग्रंथ ह्या देशाच्या मातीत लिहिले गेले. ह्या सर्वांचे मला लहानपणापासूनच आकर्षण होते. त्या आवडीपोटी अनेक जुने ग्रंथ, पुराने चाळायला घेतली. खूप काही माहिती मिळाली. विचार आला कि हि सर्व माहिती आपण इतरांना सांगावी.अर्थातच ब्लॉग शिवाय चांगले माध्यम नव्हते म्हणून हा ब्लॉग लिहायचा प्रपंच.

ह्यात देशाच्या इतिहास व अध्यात्म साहित्याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी देवांच्या आरत्या पासून, पुराणातली गोष्टी, रामायण महाभारताच्या कथा वगैरे जे काही माहिती असेल ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित मी दिलेली माहिती चुकीची किंवा अर्धी असू शकते. पण सुज्ञ वाचक त्यात दुरुस्ती करतील अशी आशा आहे.

(कृपया ह्या ब्लॉग मधील विचार पूर्णतया माझे आहेत ह्यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Post a Comment

0 Comments

Related Posts Plugin for WordPress, Blogger...